
नशिराबाद -“आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे कोणालातरी दृष्टी देऊ शकतात, आपले हृदय कोणाच्यातरी शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ एक दान नसून, ते एका विझणाऱ्या आयुष्याला दिलेले जीवनदान आहे,”* असा भावनिक आणि प्रबोधनात्मक संदेश देत आज प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वतीने गावात भव्य अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. निमित्त होते जागतिक अवयवदान दिनाचे आणि राज्य शासनाच्या ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे. सदर रॅलीचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या मोहिमेला सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठे बळ दिले.
*नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा रणसंग्राम;* घोषणांनी गाव दुमदुमले हातात माहितीपत्रके, आकर्षक पोस्टर्स आणि *”अवयवदान-श्रेष्ठ दान”, “चला अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया”* अशा घोषणा देत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी परिसर निकोप आरोग्याच्या संदेशाने ढवळून काढला. गावातील नागरिकांशी संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मनातील अवयवदानाविषयीच्या अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एका व्यक्तीचे अवयवदान आठ जणांना देऊ शकते जीवनदान! रॅलीच्या सांगता सभेत बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांनी शास्त्रीय माहिती दिली.
*”आज देशात लाखो रुग्ण केवळ अवयव वेळेवर न मिळाल्यामुळे मृत्यूच्या दारात उभे आहेत. एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे किमान ८ व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. या चळवळीत आता ग्रामीण भागानेही खंबीरपणे पुढे येण्याची गरज आहे,”* असे आवाहन डॉक्टरांनी केले. यावेळी आरोग्य यंत्रणेचे चोख नियोजन हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेतले.
*रॅलीचे शिस्तबद्ध संचलन* *आरोग्य सेवक:-* दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन, वासुदेव पाटील यांनी केले.
*तांत्रिक बाजू प्रयोगशाळा तंत्रज्ञ* नीलिमा येलगिरे व विजय सपकाळे यांनी सांभाळली. तर रॅली दरम्यान व्यवस्था राखण्यासाठी *१०२ रुग्णवाहिका चालक:-* राजाराम पाचपांडे आणि *१०८ रुग्णवाहिका चालक:-* जीवन शिरसाठ व बापू मराठे यांनी मोलाचे योगदान दिले. आरोग्य विभागाच्या या कौतुकास्पद आणि प्रभावी उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी व परिसरातून संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.



