
जळगाव : कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची दखल घेत लोकमततर्फे आयोजित ‘लोकमत सन्मान सोहळा २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा ‘लोक रत्न’ सन्मान देऊन गौरव करण्यात आला. जळगाव येथील अंकल हवेली हॉटेलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा सरस्वती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मुकेश सोनवणे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते मुकेश सोनवणे यांना ‘लोक रत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातही आपल्या कामाची ओळख निर्माण करत असताना गावातील नागरिकांनी स्वतः देऊळवाडा गावाचा लोकनियुक्त सरपंच पदाचा मान निकिता सोनवणे यांच्या गळ्यात टाकली यातूनच मुकेश भाऊची एक वेगळी ओळख निर्माण समाजहितासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत त्यांनी सामाजिक कार्यासोबतच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत लोकमततर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मानामुळे मुकेश सोनवणे यांच्या सामाजिक कार्याला आणखी एक प्रतिष्ठेची पावती मिळाली आहे.
समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, गरजूंच्या मदतीसाठी सदैव पुढाकार आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान यामुळे सोनवणे यांच्या कार्याची लोकमतने घेतलेली दखल विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ‘लोकरत्न’ सन्मान मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव तर झालाच, मात्र समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणाही मिळाली आहे.



