
जळगाव च्या देऊळवाडे गावातील मराठी शाळेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, सरस्वती पूजन, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकिता सोनवणे होत्या. गावाचे आदर्श पालक अनिल सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच निकिता सोनवणे तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष व माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सोनवणे यानी सहपत्नी प्रतिमा पूजन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालगोपाल तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
दरम्यान, मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच विविध नाटिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत सपकाळे तसेच गरुड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच निकिता सोनवणे यांनी देऊळवाडे गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला. तसेच गावातील विविध समस्या जाणून घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता गावाच्या विकासाच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण ठरला.
या प्रसंगी उपसरपंच अवंताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई सोनवणे, सुनंदाबाई सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, ग्रामसेवक गुलाब मोची आप्पा, धरती आबाचे समन्वयक अशोक बोरसे, तसेच ग्रामस्थ गेंदालाल सपकाळे, श्रीराम सोनवणे, गेंदलाल सोनवणे, माणिक सोनवणे, सोमा जोतीराम सोनवणे, सुरेश भोई यांच्यासह गावातील नागरिक, नवयुवक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीचा जल्लोष, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि गावाच्या विकासाचा संकल्प अशा त्रिवेणी संगमात देऊळवाडे चा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला.



