
‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून जाहीर पथनाट्य आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सातीबाजार चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व पटवून देत महिलांमध्ये व्यापक प्रबोधन करण्यात आले.
हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विशेष सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.
*पथनाट्य व समुपदेशनातून दिलेला महत्त्वाचा संदेश:-
चिकाचे दूध हीच पहिली लस: बाळाच्या जन्मानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. मातेचे पहिले पिवळसर चिकाचे दूध हे बाळासाठी ‘इम्युनिटी बुस्टर’ म्हणजेच पहिली लस म्हणून काम करते, ही माहिती महिलांना देण्यात आली.
*६ महिने निव्वळ स्तनपान:-* जन्मापासून पहिल्या ६ महिन्यांपर्यंत बाळाला केवळ आणि केवळ आईचेच दूध द्यावे; वरचे पाणी, मध किंवा इतर कोणतेही पदार्थ देऊ नयेत, याबाबत मातांचे समुपदेशन करण्यात आले.
*आजार आणि कुपोषणापासून बचाव:-
* नियमित स्तनपानामुळे बाळाचे कुपोषणापासून रक्षण होते. तसेच डायरिया आणि न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो.
*मातेचे आरोग्य:-* स्तनपानामुळे मातेला स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग (Cancer) होण्याचा धोका कमालीचा कमी होतो, हा महत्त्वपूर्ण संदेश याप्रसंगी देण्यात आला.
*उत्स्फूर्त प्रतिसाद व मान्यवरांची उपस्थिती :-*
या जनजागृती मोहिमेला नशिराबाद गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि जनआरोग्य समितीचे सदस्य डॉ. प्रमोद अमोदकर, न्यू इंग्लिश स्कूलचे संचालक श्री. जनार्दन माळी आणि श्री. बंडू खंडारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पथनाट्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *आरोग्य सेवक:-* दीपक तायडे, सुनील ढाके, वासुदेव पाटील, *१०२ रुग्णवाहिकेचे चालक:-* राजाराम पचपांडे तसेच परिसरातील सर्व *आशा सेविकांनी* मेहनत घेतली.


